मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नव्याने बांधण्यात आलेल्या कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळली होती. या कनेक्टिंग लिंकच्या प्रवेशद्वाराजवळच दरड कोसळून मोठ्या प्रमाणावर दगड आणि माती पसरल्याने हा मार्ग प्रवासासाठी बंद करण्यात आला होता. या घटनेनंतर विरोधकांकडून कनेक्टिंग लिंकच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, या सर्वांना आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
राज्यातील अनेक भागात कोसळत असलेला मुसळधार पाऊस आणि त्यामुळे आलेली नैसर्गिक आपत्ती तसेच सुरू असलेल्या उपाययोजना याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेमध्ये माहिती दिली. यावेळी कनेक्टिंग लिंकवर टीका करणाऱ्यांना आणि कोसळलेल्या दरडीवरून वेगवेळ्या अफवा पसरवणाऱ्यांवरही त्यांनी निशाणा साधला. एखाद कोटी लोक मेल्यावर काही जण जन्माला आले, असे फडणवीस म्हणाले.
यावेळी कोकण रेल्वेचं उदाहरण देत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ज्यावेळी कोकण रेल्वेचे बांधकाम सुरू होते त्यावेळी लोक असाच सल्ला द्यायचे. पण मधू दंडवते यांनी हिंमत दाखवून ती बांधली. कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून पंधरा वर्षे कोकण रेल्वेवर दरड कोसळली. पण आम्ही त्यातून शिकलो, असे ते म्हणाले. तेव्हाच्या आघाडी सरकारने मिसिंग लिंकचा प्रस्ताव तयार केला. तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी १४ कारणे देऊन मिसिंग लिंकची फाईल बंद केली. मात्र मी बोललो तेव्हा अधिकाऱ्यांनी हे शक्य आहे हे दाखवून दिले . त्यानंतर जगातला सर्वात मोठा रुंद बोगदा आणि भारतातील सर्वात मोठे केबल ब्रिज आपण बांधलं. जिथे १७० किमी वेगाने वारे वाहतात तिथे हा मिसिंग लिंक उभा राहिला, असे फडणवीस यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंकवर दरड कोसळली. कुठेही केबल स्ट्रेड ब्रिजला धोका नाही. बोगद्याला नुकसान झालेलं नाही. ७ हजार कोटी वाया गेल्यासारखा आव आणला गेला. मात्र काही तासांतच मिसिंग लिंकवरून वाहतूक सुरू झाली. या कनेक्टिंग लिंकमुळे घाटातले अपघात संपले. ट्रॅफिक संपलं. मी शिव्या प्रुफ आहे. दहा वर्षांनंतर शिव्या देणारे राहणार नाही. पण मिसिंग लिंक राहील, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.